वैश्य समाज मुंबई : स्थापना

“वैश्य समाज, मुंबई या संस्थेच्या स्थापनेपूर्वीची पूर्वपिटीका वर उधृत केली आहे.

'वैश्य विद्यार्थी सहाय्यक मंडळी'चे काम १९१० पर्यंत चालल्यानंतर कित्येक अडचणीमुळे ते १९२० पर्यंत तहकूब राहिले. पुढे १९२० नंतर सर्वश्री बाबाजी सदाशिव पेडणेकर, विष्णू बाळकृष्ण महाडेश्वर, सखाराम महादेव पारकर, शंकर धोंडो मसुरकर, परशुराम आबा सातोसे, विष्णूसदाशिव पेडणेकर आदि कार्यकर्त्यांनी संस्थेचे कार्य पुढे चालविण्याचे ठरवून त्याप्रमाणे संस्थेचे पुनरुज्जीवन केले. संघशक्तिने प्रयत्न केल्याशिवाय समाजस्थिती सुधारणे शक्‍य नाही असे 'वैश्य मंडळ' व 'वैश्य विद्यार्थी सहाय्यक मंडळ, मुंबई' या दोन्ही संस्थांच्या कार्यकारी मंडळाच्या सभासदांना वाटू लागले. म्हणून या दोन्ही संस्थांच्या सभासदांची एक संयुक्‍त संस्था करावी व संयुक्‍त संस्थेचे कार्यक्षेत्र विस्तृत करावे असा विचार निश्चित झाल्यानंतर, बऱ्याच वाटाघाटीनंतर दि. ६ मे १९२२ रोजी दोन्ही संस्थाचे एकीकरण करण्यात आले.

अ) ज्ञातीतील गरीब होतकरू, विद्यार्थ्या, वाड्गयात्मक, यांत्रिक, औद्योगिक, शासकीय, धंदेवाईक शिक्षणासाठी आर्थिक मदत करणे व सदर शिक्षणाचा प्रसार करणे.
आ) ऐक्यवृद्धी , संघशक्ती, परस्पर प्रेमभाव, दळणवळण वगैरे जेणेकरून होतील असे उपाय योजणे.
इ) ज्ञातीतील शिक्षणविषयक व समाजोन्नतीस पोषक अशा संस्थांचे एकीकरण करणे.
ई) मतभेद विरहीत अशी सामाजिक व धार्मिक स्वरुपाची उन्नतीची कामे करणे.
ड) समाजोन्नती ज्यांच्या योगाने होईल अशी प्रसंगोपात उत्पन्न होणारी कामे हाती घेणे.
ऊ) सदरील सर्व कार्यासाठी फंड गोळा करणे.
ह) समाजासाठी इमारत उभारणे.
ल) परस्पर सहाय्यकारी पतपेढी (को-ऑप. सोसायटी) स्थापणे.

वरील उद्देश साध्य करण्यासाठी गेल्या ५४ वर्षात कार्यकर्त्यांनी आपल्या शक्तीनुसार अल्पस्वल्प प्रयत्न केले हे खालील आढावा अवलोकन केल्यास दिसून येईल.

दि. ३१ मार्च १९२३ रोजी प्रा. कृष्णाजी महादेव खाड्ये यांच्या अध्यक्षतेखाली ज्ञातीतील पाच वर्षातील पदवीधरांचा सत्कार करण्यासाठी स्नेहसंमेलन भरविण्यात आले.

१९२४ साली ज्ञातीतील पहिल्या स्त्री पदवीधर डॉ. कु. कृष्णबाई नारायण वटे यांचा बडोद्याचे कै. न्या. नारायण बळवंत पडते यांच्या अध्यक्षतेखाली सत्कार करण्यात आला.

१९२५ साली 'धी वैश्य लिटररी अ‍ॅण्ड सोशल क्लब' ची स्थापना करण्यात आली. समाज संघटनेच्या दृष्टीने संस्थेला हा उपक्रम यशदायी ठरला. संस्थेची कार्यकर्ती मंडळी सदर क्लबमध्ये वारंवार एकत्र येऊ लागल्याने संस्थेच्या कार्याला चालना मिळू लागली व तरुण होतकरु कार्यकर्त्यात समाजकार्याची अभिरुची निर्माण झाली. त्यामुळे तरुण कार्यकर्ते लाभले. याचवर्षी धारगाळ (गोवा) येथे वैश्य परिषदेचे पहिले अधिवेशन पार पडले.
या अधिवेशनाला बडोदे मुंबई पासूल कोचीन त्रावणकोर पर्यंतचे ज्ञातीबंधू प्रथमच एकत्र आले. या परिषदेपासून प्रेरणा घेऊन पुढे वेंगुर्ले, कुडाळ, बेळगांव, मालवण, कोल्हापूर या ठिकाणी 'वैश्य समाज' स्थापन झाले व कोल्हापूर, शहापूर, बेळगांव येथे विद्यार्थी वसतिगृह उभी राहीली.

१९२७ साली मुंबई येथे 'वैश्य सेवक’ मासिक सुरू करण्यात आले या मासिकामुळे समाजात जागृती व प्रचार करण्यास उपयोग झाला.

१९३१ साली म्हापसे येथे “वैश्य” या नावाचे ज्ञातीच्या सर्वांगीण उन्नतीसाठी मासिक सुरू करण्यात आले. दुर्देवाने वर्षभरातच हे मासिक बंद पडले.

१९३४ साली मुंबई येथे समाजाचे दुसरे अधिवेशन भरविण्यात आले.

या परिषदेतील ठरावानुसार 'आदर्श वैश्य' हे समाजाचे मुखपत्र सुरू मिळाली आहे. वरील परिषदेत पास झालेल्या दुसऱ्या ठरावानुसार वैश्य एकीकरण मंडळ स्थापन झाले. शहापुर (बेळगांव) येथे “वैश्य लायब्रेरी व वसतीगृह स्थापन झाले.”

१९३६ साली कराची येथे कोकणस्थ वैश्य समाज (सिंध) कराची ही संस्था स्थापन झाली.

१९३७ साली कु. दुर्गा लक्ष्मण देऊलकर या समाजातील पहिल्या उच्च शिक्षणासाठी परदेशी जाणाऱ्या विद्यार्थीनीला शुभार्शिवाद निरोप देण्यात आला. याच वर्षी “वक्तृत्व वैश्य युवक" संघाची स्थापना झाली.

१९४० साली ज्ञातीगृहासाठी 'वैश्य ज्ञातिगूह फंड' नावाची संस्था स्थापन झाली.

१९४० ते ४५ या सहा वर्षाच्या काळात संस्थेतर्फे झालेल्या वैश्य ज्ञातीच्या सभा, संमेलने, करमणुकीचे कार्यक्रम, सत्कार समांरभ वैगरे मुळे मुंबई व मुंबई बाहेर संस्थेच्या कार्याचा प्रचार झाला. जागृती झाली. संस्थेच्या कार्याकडे लक्ष वेधले. श्री. शां. का. मळीक यांनी स्वखर्चाने गोवा, सावंतवाडी, मालवण, वेंगुर्ले, बेळगांव, कोल्हापूर वगैरे ठिकाणी क्रिष्ट संस्थेच्या कार्याचा प्रचार केला. त्यामुळे संस्थेच्या प्रगतीला पोषक अशी परिस्थिती निर्माण झाली.

१९४५ साली श्री. स. बा. महाडेश्वर यांचा मुंबई महापालिकेचे सभासद म्हणून निवडून आल्याबद्दल व कृष्णाबाई पांडुरंग भिसे या एम.ए. या चित्रकलेच्या उच्च परीक्षेत पहिल्या नंबराने पास झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला.

१९४६ साली “वैश्य विद्यार्थी संघ" चा रौप्यमहोत्सव साजरा करण्यात आला व सदर संघ “वैश्य एज्युकेशन सोसायटी" या नावाने करण्यात आला.